छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची जलजीवन मिशनच्या संचाकलपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बदलीचे आदेश काढले. जी. श्रीकांत यांनी महानगरपालिकेत दोन वर्षे अकरा महिने कारभार सांभाळला. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ३ मे २०२३ ला महापालिकेचे प्रशासक म्हणून ते रूजू झाले होते. स्मार्ट सिटीसह अनेक उल्लेखनीय कामांमध्ये त्यांचा सहभाग होता.
पाणी आणण्याचे स्वप्न अपूर्ण
महानगरपालिकेत रूजू झाल्यापासून जी. श्रीकांत यांनी शहराला मुबलक पाणी मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत नागरिकांची माफी मागितली होती. त्यांनी पाणी योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. १४ एप्रिलला नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येण्याची शक्यता आहे; पण त्यापूर्वीच जी. श्रीकांत यांची बदली झाली. उत्पत्र मिळवून देणे, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत ११ हजार १२० घरांचे भूमिपूजन, कर्मचार्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला करणे, अनुकंपा आणि लाड-पागे समितीनुसार नियुक्तीची सर्व प्रकरणे निकाली काढणे, महापालिकेतील नोकर भरती, खाम, सुखना नदीचे पुनरूज्जीवन, विकास आराखड्यातील रस्त्यांचे रुंदीकरण, अशी अनेक कामे त्यांनी मार्गी लावली. त्यांच्या कार्यकाळात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला होता.
तसेच विद्यार्थी खेळाडू, बालकलाकार यांनाही प्रोत्साहन दिले. दरम्यान, नवे आयुक्त अमोल येडगे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.















